fbpx

पालकत्व हे निसर्गाने माणसाला दिलेले वरदान आहे, आपल्या पाल्याची काळजी घेणे, त्याला योग्य प्रकारे वाढवणे. अन्न, वस्त्र, निवारा आणि प्रगतीसाठी योग्य वातावरण निर्मिती करून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य असते. पण अनेकदा मुलाला शिस्त लागावी म्हणून पालक मुलांशी कठोरपणे वागतात, पालकांच्या जीवनात असलेला तणाव नकळत मुलांवर निघतो, या गोष्टींचा मुलांवर विपरीत परिणाम होतो. शिस्त आणि हिंसा यातील नाजूक फरक आज आपण या लेख द्वारे समजून घेऊ.

बाल हिंसा म्हणजे लहान मुलांवर शारीरिक, भावनिक किंवा लैंगिक पद्धतीने झालेले अत्याचार. उदा. मुलांच्या सामान्य गरजा पूर्ण न करू शकणे, त्यांचे शिक्षण पूर्ण न होऊ देणे, मुलांना अपमानित करणे, आजारी असताना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून न देणे, बाल हिंसेमुळे पालक आणि पाल्यामधील नातेसंबंध खराब होतात आणि यातून बाहेर येण्यासाठी पाल्याला पुढे प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात.

पालकांकडून होणारी हिंसा त्यांच्या लक्षात का येत नाही ?

पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात आणि त्यांना जे शक्य होईल ते करतात हा विचार आपल्याकडे पूर्वापार चालत आला आहे, पालक कधीच चुकीचे नसतात हे असत्य विधान आपल्या मनात ठाम झालेले असते, आपल्या कोणत्याही कृतीमुळे मुलांना मानसिक, शारीरिक त्रास होऊ शकतो किंवा त्यांना दुर्लक्षित वाटू शकते ही कल्पनाच पालकांना रुचत नाही, लहानपणी आपण कोणत्याही प्रकारचे parental abuse अनुभवले नसल्याने अश्या गोष्टी अस्तित्वात असतात यावर देखील पालकांचा विश्वास बसत नाही. लहान मुलांवर होणारी हिंसा आणि दुर्लक्ष हे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक समाजात आढळून येते.

मुलांवर या हिंसेचे काय परिणाम होऊ शकतात ?

जेव्हा हिंसेचे शिकार झालेली मुले मोठी होतात तेव्हा त्यांना या हिंसेचे अनेक परिणाम भोगावे लागतात. त्यांना डिप्रेशन, भावनिक स्तब्धता, नातेसंबंध निर्मितीत कमतरता, सतत भीती आणि बिघडलेली शारीरिक सुसूत्रता यांचा सामना करावा लागतो. अनेकदा आपण चांगले पालक होऊ शकत नाही या विचाराने ते कधीच मुलांना जन्म न देण्याचा निर्णय घेतात. लहानपणी दुर्लक्षित झालेली मुले ही आपल्या भावना मांडायला घाबरतात तर त्यांना भविष्याची भीती देखील सतावत असते, त्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या देखील उद्भवू शकतात. मार खाऊन मुले कोडगी होतात.

लहानपणी झालेली हिंसा विसरता येते का ?

लहानपणी झालेली हिंसा आणि त्याचा आठवणी या व्यक्तीला सतत आठवत असतात. यामुळे post traumatic stress disorder (PTSD), antisocial personality आणि substance abuse – जसे दारू किंवा ड्रग्स चे व्यसन असे मानसिक आजार होतात. वास्तविक हिंसेच्या आठवणी या मूळ हिंसेपेक्षा जास्त त्रासदायक असतात. या हिंसे मुळे व्यक्तीचे self esteem आणि self image देखील खराब होते. ही हिंसा सहज विसरणे शक्य नसते. यामुळे पालकांचा द्वेष करणे आणि त्यांना मानाचे स्थान देणे देखील मुलांना कठीण जाते. यात अगदी वाईट केस म्हणजे कळत्या वयात आल्यानंतर ही मुले पालकांना दोष देतात आणि त्यांना मारहाण करणे, घालून पाडून बोलणे किंवा वृद्धाश्रमात पाठवणे अशी पाऊले उचलतात.

शिस्त आणि हिंसा यातील फरक –

आपल्या मुलाला शिस्त लागावी हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. त्यामुळे त्याच्याकडून काही चूक झाली की त्याला ओरडणे, मारणे, घालून-पाडून बोलणे, दुर्लक्ष करणे, कोंडून ठेवणे अशा शिक्षा त्याला दिल्या जातात. यामुळे शिस्त लागेल असा समज असला तरी त्याचे मुलाच्या मनावर काय परिमाण होतात हे पालकांना सहज कळत नाही.

हिंसेचे काही प्रकार

✳️ शारीरिक हिंसा –

 मुलांना हाताने किंवा काठीने मारणे.
 कोणत्याही गरम वस्तूने पोळणे/ चटके देणे.
 बांधून ठेवणे.
 एखादी वस्तू फेकून मारणे.
 खोलीत डांबून ठेवणे.

✳️ मानसिक हिंसा –

 तुलना करणे.
 सतत मुलांना मूर्ख, मंद असे बोलणे.
 मुलांना विनोदी पात्र बनवून जोक्स बनवणे.
 सतत दोष देणे.
 मुलांना विक्षिप्त नावांनी चिडवणे.
 मार्क्स वरून बोलणे.
 मुलगी आहे म्हणून तिरस्कार करणे.
 जा कुठेतरी जीव दे असे बोलणे.
मानसिक हिंसा खूपच घातक असते कारण त्यामुळे पालक आणि पाल्याचे नाते दृढ होत नाही, आणि पाल्याला स्वतःबद्दल विश्वास निर्माण करण्यात, पुढे नाते प्रस्थापित करण्यात अडचण येते.

एका स्टडी नुसार नकारात्मक शब्द लहान मुलांच्या मेंदूच्या प्रगतीवर विपरीत परिमाण करतात, MRI नुसार सतत नकारात्मक बोलले जाणाऱ्या मुलांचा मेंदू इतरांच्या तुलनेत कमी विकसित असतो आणि त्यांची समाजात टिकून राहण्याची आणि लढाई करण्याची शक्ती कमकुवत असते.

दुर्लक्ष करणे –

जेव्हा पालक मुलांच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात तेव्हा देखील मुलांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ लागतात. सगळेच पालक हे स्वखुशीने करत नाहीत. उदा. नोकरी करणारे पालक आपल्या मुलांना इच्छा असून देखील वेळ देऊ शकत नाहीत किंवा घटस्फोट, एका पालकाचे अकाली निधन, गरिबी, सावत्र पालक अशा परिस्थिती मधून जाताना मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि आरोग्य विषयक गोष्टीकडे दुर्लक्ष होते. 

वरील पैकी काही परिस्थिती या आपल्या हातात नसतात पण दुर्लक्षित भावनेमुळे स्वतःला दोष देणे, rejection ची भीती वाटणे, खूप राग येणे, लाज वाटणे अशा अनेक कमतरता निर्माण होतात आणि आपल्या भावनांना काहीच किंमत नाही असे त्यांना सतत वाटत असते, अनेकदा ते आपल्या भावना लपवणे पसंत करतात.

यावर उपाय म्हणजे आपली परिस्थिती जरी बदलू शकत नसलो तरीही मुलांना भावनिक दृष्टया समजून घेणे आणि सत्य त्यांना पटवून देणे. मुलांना वेळ द्या आणि शक्यतो त्यांना आधार द्या.

पुरुष प्रधान संस्कृती मध्ये आणखी एक प्रकार सर्रास आढळतो जो देखील मानसिक हींसेचाच प्रकार आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याची अमानत हा समज समाजात असल्याने मुलींना आणि मुलाला वेगळी वागणूक दिली जाते. उदा. जेवण झाल्यानंतर मुलगा तसाच टीव्ही बघत असतो आणि मुलगी सर्व भांडी उचलून नेवून ठेवते. आई ला किचन आवरायला मदत करते. या भेदभावाचा मुलींच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो आणि यातूनच स्त्री म्हणजे दुय्यम ही भावना पुढे जाते. त्यामुळे पालकांनी मुलगा आणि मुलगी यात भेद करू नये.

गेल्या दशकात शहरी भागात ह्या बाबतीत अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत, एक सुजाण पालक म्हणून आपण या महत्वाच्या विषयाकडे गांभीर्याने पाहणे गरजचे आहे.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.