fbpx

रेकी ही ऊर्जा संक्रमण प्रणाली वर काम करणारी पूरक उपचारपद्धती आहे, रेकी करणारी व्यक्ती तिच्या शरीरातील वैश्विक ऊर्जा तिच्या हाता द्वारे दुसऱ्या व्यक्तीला प्रदान करते, जाणकारांच्या मते रेकी मधून असाध्य रोग वगळता बाकी अनेक रोग आणि आजार बरे होण्यास मनोबल मिळते. आजच्या लेखात आपण रेकी उपचार पद्धती, तिचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि भवितव्य या मुद्यांवर अधिक माहिती घेऊ.

रेकी म्हणजे काय ?

मुळात रेकी हा एक जपानी शब्द आहे, “रे” म्हणजे वैश्विक आणि “की” म्हणजे ऊर्जा हा शब्दशः अर्थ होतो. ऊर्जा संक्रमण प्रणाली हा रेकी चा गाभा आहे. रेकी उपचार करणाऱ्यांच्या मते कोणत्याही अपघात, जखम किंवा मानसिक तणावामुळे शरीरात ऊर्जेचे / एनर्जी चे ब्लॉक / अडथळे तयार होतात आणि याच ब्लॉकेज मुळे आपण आजारी पडतो. रेकी मध्ये जेव्हा उपचार करणारी व्यक्ती रुग्णाच्या शरीरात ऊर्जा संक्रमित करते तेव्हा त्या वैश्विक ऊर्जेच्या प्रवाहामुळे निर्माण झालेले ब्लॉक निघून जातात, त्यामुळे व्यक्तीच्या वेदना कमी होतात, शरीर रिलॅक्स होते आणि रुग्ण लवकर बरा होतो.

जपानचे डॉक्टर मिकाओ उसुई यांनी मॉडर्न रेकी ची संकल्पना 1922 मध्ये मांडली परंतु लोक रेकी चा वापर साधारण 2500 वर्षापासून करत आहेत असा अंदाज आहे. अनेक लोक याचा संबंध येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध आणि योगशास्त्र यांच्याशी जोडतात. येशू हस्त स्पर्शाने लोकांना बरे करत असत म्हणजे ते रेकीच करत असा मिकाओ यांचा दावा होता.

रेकी उपचारांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. पहिला भाग स्पर्श आणि दुसरा भाग अंतर आहे. हाताच्या स्पर्शाने पहिल्या भागात रेकी दिली जाते. यात, उपचार करणारे हातांनी रुग्णाला रेकी देतात. दुसर्‍या भागात, रेकी जगातील कोणत्याही कोपऱ्यात बसून दिली जाऊ शकते. यावेळी, उपचार करणाऱ्याला रुग्णाची नावे, फोटो इत्यादींची माहिती द्यावी लागते. तेथे रुग्ण उपस्थित असणे आवश्यक नाही. स्पर्श रेकी प्रमाणेच तीही शक्तिशाली रेकी आहे.

रेकी सत्र कसे असते ?

रेकी उपचार हे शांत जागी दिले जातात, उपचार करणारे आणि रुग्ण असे दोघेच सेशन मध्ये असतात. परंतु रेकीच्या दुसऱ्या पद्धती मध्ये जगात कुठेही बसून उपचार करता येतात. रेकी उपचार देणारी व्यक्ती त्याचा हाताचा तळवा रुग्णाच्या ठराविक भागांवर ठेवते. (उदा. जखम किंवा दुखत असलेल्या ठिकाणी, भाजले असेल तर त्या जखमेच्या वर अधांतरी) हात ठेवून मग वैश्विक ऊर्जेचे संक्रमण रुग्णात केले जाते एक सायकल किंवा चक्र साधारण 3 ते 10 मिनिटांचे असते. उपचार करणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा संक्रमित होताना हात थोडा उष्ण किंवा मुंग्या आल्या सारखा वाटू लागतो, जेव्हा ऊर्जा संक्रमण पूर्ण होते तेव्हा या भावना शांत होतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असे सायकल रिपीट केले जातात.

रेकी साठी अनेक लोक क्रिस्टल किंवा अन्य काही वस्तू देखील वापरतात. याबद्दल अनेक लोकांची अनेक मते आहेत. काही लोक वस्तूंच्या वापरला मान्यता देतात तर काहींच्या मते फक्त उपचार करणारा हे ऊर्जा संक्रमणाचे एकमेव माध्यम आहे. रेकीच्या दुसऱ्या प्रकारात शक्यतो क्रिस्टल, पावडर किंवा अन्य गोष्टी वापरून ऊर्जा लांब असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहचवली जाते.

रेकी चे सत्र साधारण 45 ते 90 मिनिटांचे असते. व्यक्तीच्या आजारा नुसार किती सत्र घ्यावे लागतील हे ठरते. परंतु याचा फायदा होण्यासाठी रुग्णाचा उपचार करणाऱ्यावर आणि या पद्धतीवर विश्वास असणे आवश्यक आहे.

रेकी चे फायदे –

रेकी मध्ये वैश्विक ऊर्जा म्हणजेच “की” याचा उच्चार “ची” असा देखील केला जातो, “Tai-chi” प्रकारात देखील हीच वैश्विक ऊर्जा असते असा तज्ञांचा समज आहे.

रेकी बद्दल कोणतेही क्लिनिकल आणि वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु सांख्यिकी माहिती द्वारे अनेक लोकांना रेकी चा फायदा झाला आहे असे जाणवते, अनेक उपचार करणारे म्हणतात की अजून विज्ञानाने असे कोणतेही तंत्र विकसित केले नाही जे वैश्विक ऊर्जा आणि तिचे संक्रमण यांचे मोजमाप करू शकेल, परंतु रुग्णाला या ऊर्जेचा अनुभव सहज होतो.

रेकी मुळे व्यक्ती रिलॅक्स होते, शरीराची नैसर्गिक healing प्रोसेस जलद होते आणि रुग्णाला मानसिक, शारीरिक आणि भावनिक आधार मिळतो. तसेच भावनिक तणाव कमी करायला देखील रेकी उत्तम पर्याय मानला जातो.

रेकीचा वापर पुढील आजारांमध्ये पूरक उपचारपद्धती म्हणून केला जातो.
✳️ कॅन्सर
✳️ हृदयरोग
✳️ चिंता/ anxiety
✳️ डिप्रेशन
✳️ जुनाट दुःख/ chronic pain
✳️ ऑटीझम इत्यादी

रेकी कोणत्याही प्रकारे मेडिकल उपचारांचा पर्याय असू शकतं नाही, तिचा वापर नेहमीच पूरक (complementary) उपचार पद्धती म्हणूनच करायला हवा. कॅन्सर रुग्ण उपचार घेताना chemo नंतर जर रेकी घेत असतील तर त्यांना रिलॅक्स आणि शांत वाटू शकते. पण रेकी सुरू आहे म्हणून chemo बंद करणे हा वेडेपणा ठरेल.

रेकी घेणारे रुग्ण अनेकदा सांगतात की शरीरात ऊर्जा येत असताना त्यांना उपचार करणाऱ्याचा हात गरम किंवा थंड वाटतो, तर शरीरात कंपने जाणवतात. तसेच मनावर असलेला तणाव कमी होतो.

रेकी उपचारक कसे व्हावे ?

रेकी साठी कोणतीही वैद्यकीय किंवा मानसशास्त्र पदवी गरचेजी नाही, किंवा रेकी साठी कोणताही ठराविक उपक्रम नाही, अनेक संस्था यासाठी छोटे छोटे कोर्स घेतात ज्यात विद्यार्थ्यांना पुढील गोष्टी शिकवतात.
✳️ शरिराभोवती असणारी वैश्विक ऊर्जा
✳️ ऊर्जा संक्रमण कसे करावे ?
✳️ रेकी चे नीतिशास्त्र (ethics)

रेकी चा वापर मानसोपचारात देखील केला जातो. व्यक्तीला त्याच्या सत्य परिस्थिती / अस्तित्वाशी जोडण्यासाठी अनेकदा रेकी उपचाराचा सल्ला आम्ही देतो. सेल्फ रेकी देखील यावर उत्तम पर्याय आहे. सेल्फ रेकी कशी करावी हे थेरपिस्ट तुमच्या गरजेनुसार ठरवतात.

रेकी वर खूप कमी प्रमाणात रिसर्च झाला असल्याने त्याची दखल मोठ्या प्रमाणात घेतली गेली नाही परंतु तिचे कोणतेही नकारात्मक परिमाण नसल्याने कमी कालावधीत ही प्रसिद्ध झाली आहे. आपण जर आपल्या चालू उपचारांसोबत जर रेकी उपचार सुरू करत असाल तर तुमच्या डॉक्टर / थेरपिस्ट ना सांगून सुरू करु शकता पण रेकी हा एकमेव उपचार असू शकत नाही.

Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.